Bussiness Ideas श्रीमंत होण्यासाठी उत्तम लघुद्योग
मित्रांनो जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी जीवनात पैसे कमवणे तितकेच महत्वाचे आहे. व पैसे कमावण्यासाठी तुम्हाला काही खास व्यवसायाची माहिती असणे तुम्हाला गरजेचे आहे. व त्यासाठी तुम्हाला आम्ही एका चांगल्या व्यवसायाची माहिती सांगणार आहोत. हा व्यवसाय तुम्ही १०-१५ हजारात भांडवली खर्च मध्ये चालू करू शकता. तर मित्रांनो हा लेख तुम्ही संपूर्ण वाचा आणि इतरांना नक्की पाठवा.
आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतीपासून अनेक उत्पादन घेतले जाते. यामध्ये बटाटा हे पीक संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतले जाते. त्यामुळे बटाटा हे फळ तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल. बटाटापासून तयार केलेले पापड, चकली यासारख्या पारंपरिक पदार्थांपासून वेफर्स, चिप्स, फ्रेंच फ्राईज यासारख्या आधुनिक प्रक्रियायुक्त अन्नापर्यंत सर्व प्रकारचे पदार्थ सर्वत्र आवडीने खाल्ले जातात.त्याचप्रमाणे अशा प्रक्रियायुक्त पदार्थाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणूनच बटाट्यापासून पारंपरिक आणि आधुनिक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याचा लघुउद्योग हा स्वयंरोजगार निर्मितीचा एक उत्तम पर्याय ठरू शकेल.
शेतात पिकविल्या जाणाऱ्या निरनिराळ्या पालेभाज्या, फळभाज्या किंवा कंदमुळवर्गीय भाजीपाल्यांपैकी बटाट्याची साठवण क्षमता सर्वात जास्त आहे. बटाट्याची साठवण शीतगृहात ४ अंश सें.ग्रे. तापमान आणि ९० टक्के आर्द्रतेला केल्यास बटाटे ६ ते ८ महिने चांगल्या स्थितीत राहतात. म्हणूनच बटाट्यावर आधारित लघुउद्योग करण्यासाठी कच्चा माल दीर्घकाळ उपलब्ध होऊ शकतो.
लघुद्योग – बटाटा प्रक्रिया
बटाट्यापासून वेफर्स, चिप्स, फ्रेंच फ्राईज, पावडर, पुर्ननिर्मित वेफर्स, स्टिक्स यासारखे पदार्थ तयार करतात. या पदार्थाचा कुरकुरीतपणा, खारट, तिखट चव आणि खमंग स्वाद यामुळे लहान थोरांपासून सर्व स्तरावरील ग्राहकांना बटाट्याचे पदार्थ आवडतात. बटाट्यापासून आधुनिक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याचा लक्षावधी डॉलरचा उद्योगधंदा युरोप- अमेरिकेत चालतो. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी बटाट्यापासून तयार केलेली आपली उत्पादने आकर्षक वेष्टनाचा आणि जाहिरातीचा वापर करून जगभर प्रसिद्ध केली असून त्यांनी आपल्याकडील बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर काबीज केली आहे.
जगात प्रतिवर्षी सुमारे ३० दशलक्ष टन बटाट्याचे उत्पादन होते. भारतात त्यापैकी फक्त १२ दशलक्ष बटाटा उत्पादित होतो. आपल्याकडील बहुतेक उत्पादन हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या थंड हवामानाच्या प्रदेशात घेतले जाते. त्यामुळे बटाट्यावर प्रक्रिया करणारे भारतातील प्रमुख कारखाने या भागात विकसित झाले आहेत. महाराष्ट्रात बटाट्याचे उत्पादन प्रामुख्याने खेड- मंचर आणि कोरेगाव – खटाव या भागात होते. म्हणूनच आपल्याकडे बटाट्यावर प्रक्रिया करण्यासाठी लघुउद्योगास चांगला वाव आहे.
बटाट्यापासून लघुउद्योग स्तरावर खालील प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात.
बटाटापासून वेफर्स
- वेफर्स तयार करण्यासाठी मध्यम आणि गोल आकार असलेले ताजे, पांढरे व टणक बटाटे घ्यावेत. बटाट्याच्या कंदात कमीतकमी मुक्त साखरेचे प्रमाण असल्यास उत्तम प्रकारचे वेफर्स तयार करता येतात.
- त्याकरिता खास वेफर्ससाठी निर्माण केलेल्या चिपसोना नं. १ व चिपसोना नं. २ या नवीन जातीच्या बटाट्याचा वापर करावा.
- शीतगृहात साठविलेले बटाटे असल्यास ते वेफर्स करण्यापूर्वी नेहमीच्या तापमानास ८ ते १० दिवस ठेवावेत व नंतर त्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ करावेत.
- बटाटे प्रथम पाण्यात धुऊन स्वच्छ करतात.
- नंतर यंत्राच्या सहाय्याने संपूर्ण साल काढून हातमशिन किंवा चिप्सच्या यंत्राचा वापर करून १ मि. मी. जाडीचे काप पाडतात.
- हे काप ५ टक्के मिठाच्या द्रावणात साठवावेत. तळण्यास घेताना हे काप स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावेत व लगेच उकळत्या रिफाइंड तेलात (पामोलीन) सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळावेत.
- साठवणीतील, मऊ पडलेले तसेच आतील भाग पिवळसर पडला असेल तर अशा बटाट्याचे काप तळण्यापूर्वी ५ टक्के मीठ आणि ०.२५ टक्के कॅल्शियम क्लोराईड किंवा तुरटीच्या मिश्र द्रावणात २० ते ३० मिनिटे बुडवून ठेवावेत.
- वेफर्स तळत असतांना तेलाच्या पृष्ठभागावर येताच किंवा कढईतून बाहेर काढल्यावर त्यावर लगेच ५ टक्के मिठाच्या पाण्याचा फवारा मारल्यास उत्तम प्रतीचे नेहमीचे खारे वेफर्स तयार होतात. याशिवाय, वेगवेगळ्या मसाल्याच्या मिश्रणाचा अर्क काढून तो फवारल्यास विविध चव व रंग असलेले वेफर्स तयार करता येतात.
- बटाट्याचे काप करतांना विविध प्रकारचे साचे वापरून साधे, प्लेन किंवा डिझाइनचे काप केल्यास वेफर्सच्या आकारात आणि चवीत विविधता आणता येते. वेफर्स थंड झाल्यावर प्लॅस्टिकच्या पिशव्यांत बाजारभाव आणि मागणीप्रमाणे वजनाचा विचार करून भरावेत. अशाप्रकारे तळलेले चिप्स बंद पिशवीत साधारणपणे १५ ते २० दिवसांपर्यंत उत्तम रहातात.
- वेफर्स जास्त काळ बंद पिशवीत राहिल्यास त्यामधील तेलाचे विघटन घडून येते व वेफर्सला एक प्रकारचा उग्र खवट वास येतो. ते टाळण्यासाठी आणि वेफर्स दीर्घ काळ साठविण्यासाठी वेफर्स तळण्यापूर्वी तेल ०.१ टक्का बीएचए + ०.१ टक्का बीएचटी सारखी तेलाचे ऑक्सिडीकरण विरोधी खाद्य रसायने मिसळावीत.
- तसेच पिशवीत पॅक करताना स्वयंचलित सिलींग यंत्राचा वापर करून पिशव्यात वेफर्स बरोबर नत्र वायू भरून पिशव्या हवाबंद कराव्यात. असे वेफर्स १ ते १.५ महिन्यापर्यंत टिकतात.
बटाटापासून चिप्स
- चिप्स तयार करण्यासाठी वेफर्सप्रमाणेच साल काढलेल्या बटाट्याचे २ मि.मी. जाडीचे काप करून ते ५ टक्के मिठाच्या द्रावणात साठवावेत. हे कापल्यानंतर उकळत्या पाण्यात ४ ते ५ मिनिटे शिजवून चाळणीवर पाणी निथळून सूर्य प्रकाशात किंवा ड्रायरमध्ये ४० ते ५० अंश सें.ग्रे. तापमानास वाळवून बंद पिशवीत भरून ठेवावेत.
- हे चिप्स गरजेप्रमाणे तेलात तळून वापरता येतात. आपल्याकडे घरगुती स्तरावर चिप्स करण्यासाठी या पद्धतीचा वापर प्रामुख्याने होत असला तरी व्यापारी तत्त्वावर तसेच ग्राहकास खाण्यासाठी तयार वेफर्सलाच मागणी जास्त आहे. हे चिप्स गरजेप्रमाणे तेलात तळून वापरता येतात. आपल्याकडे घरगुती स्तरावर चिप्स करण्यासाठी या पद्धतीचा वापर प्रामुख्याने होत असला तरी व्यापारी तत्त्वावर तसेच ग्राहकास खाण्यासाठी तयार वेफर्सलाच मागणी जास्त आहे.त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय निवडून चांगल्या प्रकारे उत्पन्न कमवू शकता.
बटाटापासून पुर्ननिर्मित वेफर्स
बटाटापासून पुर्ननिर्मित वेफर्स हा एक नवीन प्रकार हल्ली अस्तित्वात आला असून विशेषतः परदेशात त्यास चांगली बाजारपेठ मागणी मिळत आहे. असे वेफर्स तयार करण्यासाठी लहान मोठे आणि कोणत्याही आकाराचे बटाटे वापरता येतात. शिवाय, अशा वेफर्समध्ये चवीसाठी मीठ, मसाले, कुरकुरीतपणासाठी मक्याचे पीठ मिसळून यंत्राच्या सहाय्याने त्याचा एकजीव लगदा करतात. लगद्याचे योग्य आकाराचे गोळे करून, ठरावीक जाडीच्या लाट्या लाटून, साच्याचा वापर करून एकसारख्या आकाराच्या चकत्या पाडून वाळवितात. नंतर अशा चकत्या तेलात तळून वेफर्स म्हणून वापरल्या जातात.
बटाटापासून फ्रेंच फ्राईज
फ्रेंच फ्राईज हा बटाटा प्रक्रिया उद्योगातील एक महत्त्वाचा पदार्थ असून त्यास विशेषत: हॉटेल आणि बारमध्ये मोठी मागणी असते. फ्रेंच फ्राईज करण्यासाठी मोठे व लांबट आकाराचे ताजे बटाटे घेऊन प्रथम पाण्याने स्वच्छ करून त्याची साल काढतात. नंतर सुरीने किंवा विशिष्ट यंत्राने त्याचे १ सें.मी. जाडीचे व ५ ते १० सें.मी. लांबीचे काप करून ते मिठाचे आणि कॅल्शियम क्लोराईडचे द्रावणात ५ मिनिटे बुडवून ठेवतात. नंतर त्यावरील पाणी निथळून तेलात तांबूस रंग येईपर्यंत तळतात. व्यापारी स्तरावर फ्रेंच फ्राईज करताना काप द्रावणातून काढून त्यावर ५ मिनिटे उकळत्या पाण्याची किंवा वाफेची प्रक्रिया करून असे काप अति थंड वातावरणात ठेवतात आणि मागणीप्रमाणे तेलात तळून ग्राहकांस देतात.
बटाटापासून पावडर (पीठ)
बटाट्याचे पीठ तयार करण्यासाठी कोणत्याही आकाराचे ताजे बटाटे चालतात. पाण्यात संपूर्ण शिजवून, साल काढून,बटाट्याचा लगदा तयार करतात. आणि ड्रम ड्रायरसारख्या किंवा कॅबिनेट ड्रायरसारख्या यंत्राचा वापर करून संपूर्ण वाळवितात. नंतर पुन्हा दळणयंत्रात एकजीव पावडर करून बंद पिशवीत किंवा डब्यात साठवितात. बटाट्याच्या पिठाचा उपयोग बेकरी तसेच विविध कुरकुरे प्रकारच्या पदार्थ उत्पादनात मोठ्या प्रमाणात केला जातो. बटाट्याची पावडर करताना त्यावरील साल १०० टक्के वेगळी करणे अनिवार्य असते. विविध वेड्यावाकड्या तसेच कोंबाजवळ खड्डे असलेल्या बटाट्याची साल व्यवस्थित निघत नाही. शिजवलेल्या बटाट्याचा लगदा करण्यापूर्वी थोडी जरी साल राहिली तरी त्यापासून तयार होणाऱ्या पिठाची प्रत चांगली ठरत नाही. म्हणून बऱ्याच मोठ्या कंपन्या बटाट्याचे पीठ परदेशातून आयात करतात. शक्यतो गोल व लहान आकाराचे बटाटे पीठ करण्यासाठी उपयुक्त असतात.
बटाटापासून पारंपरिक पदार्थ
आपल्याकडे घरगुती स्तरावर बटाट्यापासून पारंपरिक पद्धतीने पापड, चकल्या, खिस यासारखे पदार्थ मोठ्या प्रमाणावर तयार करून उपवासासाठी वापरतात. खरे म्हणजे पापड, चकल्या यासारखे पदार्थ करताना बटाट्याचा शिजवून लगदा करावा लागत असल्यामुळे त्यामध्ये चवीसाठी तसेच खुसखुशीतपणा वाढविण्यासाठी मसाले, तिखट, शाबुदाणा किंवा शेंगदाण्याचा कूट मिसळणे शक्य असते. त्यामुळे अशा पदार्थांची चव तर वाढतेच, शिवाय इतर अन्नघटकांचा वापर होत असल्यामुळे उत्पादनही वाढते. पापड, चकल्या आणि खिस हे पदार्थ तयार करण्याच्या पारंपरिक कृतीमध्ये योग्य सुधारणा करून त्याचे व्यापारी स्तरावर प्रमाणित उत्पादन करणे शक्य असून अशा पदार्थांनाही मोठी बाजारपेठ मिळू शकते.
कोणताही प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करताना कच्चा माल हा उत्तम प्रतीचा असावा लागतो. बटाटे शक्यतो ताजे, टणक, आतून पांढरे असावेत. पृष्ठभागावर सुरकुत्या पडलेले, दबणारे, आतमध्ये पिवळसर तसेच पृष्ठभागावर हिरवट रंग आलेले किंवा कोंब फुटलेले बटाटे प्रक्रिया करण्यासाठी वापरू नयेत. त्यामुळे तयार होणाऱ्या पदार्थाचा रंग काळपट- लाल होतो. त्याचा कुरकुरीतपणा, चव आणि उत्पन्न कमी होते. शीतगृहातील बटाटे वापरायचे झाल्यास, असे बटाटे वापरण्यापूर्वी नेहमीच्या तापमानास ८ ते १० दिवस ठेवावेत म्हणजे त्यामधील मुक्त साखरेचे प्रमाण कमी होऊन पदार्थ काळपट – लाल पडणार नाहीत.
सर्वसाधारणपणे लहान स्तरावर दररोज ५० किलो बटाटे जरी प्रक्रियासाठी वापरून वेफर्स, चिप्स, फ्रेंच फ्राईज, पावडर, चकली, पापड, खिस असे पदार्थ तयार करून स्थानिक बाजारपेठेत विकले तरी दररोज अंदाजे ४०० ते ५०० रुपये निव्वळ नफा कमविता येईल.
वरील कोणत्याही प्रकारचे बटाटापासून पदार्थ बनवण्याचे उद्योग सुरू करून तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न कमवू शकता. यासाठी तुमच्याकडे जर भांडवल नसेल तर तुम्ही PMEGP या शासनाच्या ३५ टक्के सबसीडी मधून हा व्यवसाय चालू करू शकता. आणि तुम्ही तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.